आशीष अम्बाडे, झी मीडिया : मुंबई :  मानवाच्या उत्क्रांतीचे अनेक अवशेष  आजवर उत्खननाच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आले आहेत. त्यातच आता अश्मयुगीन काळातील आणखी काही गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातच उत्खननादरम्यान, हा खजिना सापडला असून, त्या ठिकाणी आता संग्रहालय उभं करण्यात येणार आहे. गेल्या ६० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चंद्रपुरात अखेर वैद्यकीय महाविद्याल उभारण्याचं काम  सुरु करण्यात आलं. 


महाविद्यालयासाठी चंद्रपूर शहराच्या बल्लारपूर वळण मार्गावरील १०० एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली. मात्र आराखडा पूर्णत्वास येत असताना अमित भगत या पुरातत्व अभ्यासकाला या अधिग्रहित जमिनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन खजीनाच सापडला आहे.


गॅझेटियरच्या माध्यमातून त्याला याची माहिती मिळाली आणि त्यानं याचा  बारकाईनं अभ्यास केला. 


१०० एकर पैकी सुमारे १० एकर जागेवर त्याला सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अश्मयुगीन मानवाचं वास्तव्यस्थळ सापडलं आहे. हे ठिकाण म्हणजे अश्मयुगीन काळातील सर्वात मोठं दगडी हत्यार निर्मितीचं केंद्र असावं इतके अवशेष इथं सापडले आहेत. 


हत्यार निर्मिती केंद्राबद्दल हा शोध लागताच या स्थळाच्या महतीचा एक विस्तृत अहवाल विविध संदर्भसूचींसह अमित भगत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या CMO कार्यालयाकडे पाठवण्यात आला. 


या अहवालानुसार आता या स्थळाला संरक्षण देण्यासाठी प्रस्तावित महाविद्यालयाचा निधी आणि राज्य सरकार आपला वाटा देणार आहे. 


पापामिया टेकडीवरील या ठिकाणी ७५ टक्के भागात राज्य पुरात्तव विभाग आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाचा चमू उत्खनन करणार आहेत. या खोदकामातून मिळालेल्या वस्तू, हत्यारं आणि अश्मयुगीन जीवाश्म साहित्य यांचे याच स्थळी एक संग्रहालय उभारलं जाणार आहे. 


सर्वात महत्वाची बाब म्हणजे या १० एकर अश्मयुगीन स्थळांपैकी पाव भाग हा संरक्षित ठेवत त्यावर काचेचं आवरण तयार केलं जाईल.. त्यामुळे पर्यटकांना हे अश्मयुगीन साहित्य प्रत्यक्षात जसंच्या तसं पाहण्याची संधी मिळेल.


दरम्यान, चंद्रपूरकरांसाठी पापामियाची टेकडी म्हणजे सहलीसाठीचं ठिकाण. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित  प्रकल्पामुळे हा भाग अधिक विकसित होणार आहे. एका ध्येयवेड्या संशोधकाच्या पाठपुराव्यामुळे या टेकडीला जागतिक ओळख मिळणार आहे हेसुद्धा तितकच खरं.