विकास भदाणे, झी मिडीया  जळगाव  : निसर्गाचा लहरीपणा, बियाणे आणि खतांच्या वाढत्या किंमती तसेच शेतीमालाचे पडलेले दर या सगळ्या अडचणीतून राज्यातील शेतकरी जात आहे. आज बागायतदार शेतक-याल शेती करणे परवडत नाही. कोरडवाहू अल्पभूधारक शेतक-याची अवस्था तर विचारु नका. अनेक अडचणी असतानाही शेतकरी काळ्या आईची सेवा करतो. शेतीत खपणं म्हणजे काय हे जळगाव जिल्ह्यातील हिरामण पाटील या अल्पभूधारक शेतक-याची कहाणी बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांच्या कर्जमाफीवर  सोशल मिडीयात सवाल करत  लाईक मिळवून, स्वताला विचारवंत म्हणवून घेणं शहरी लोकांना खूप सोप असतं.. पण कोवळा नातू आणि पोटच्या पोराला  बैलाच्या जागी औताला जुंपतांना हिरामण पाटील यांना खरंचं बरं वाटतं असेल का? पण परिस्थितीनं या हाडाच्या शेतक-यावर ही वेळ आणलीय. 


दीड एकरात औताचा फाळ माती चिरत जातो आणि काळीज दगडा सारखं होतं. जळगाव जिल्ह्यातील खडकी बुद्रुकचे रहिवासी असलेल्या हिरामण पाटील यांना अवघे दीड एकर जमीन असून त्यातून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नाही..त्यामुळे शेती कामासाठी बैलजोडी घेणं आणि ती वर्षभर सांभळणं पाटील यांना परवडत नाही..पण असं असतानाही पाटील यांनी शेती करणं सोडलं नाही. 


पाटील कुटुंब मोलमजूरी करुन गुजरान करतं मात्र खरीप हंगामात ते आपल्या वडिलोपार्जित शेतीत राबतात.यंदा  त्यांनी कपाशीचं नियोजन केलंय.


शेतकरी केवळ व्यवसाय म्हणून शेती करत नाही तर काळ्या आईवर त्याचं अपार प्रेम आहे आणि त्यामुळेच  भलेही तोटा झाली तरी शेतकरी शेती करणं सोडत नाही. हिरामण पाटील हे त्यापैकीच एक आहेत. ही अवस्था एकट्या पाटील कुटुंबाची नाही तर  राज्यातील सर्व अल्पभूधारक शेतक-यांचं हे प्रातिनिक उदाहरण आहे.