प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातील माले इथं अवघ्या अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीचा भटक्या कुत्र्याने बळी घेतला. कस्तुरी माणिक चौगुले असं कुत्र्याच्या हल्यात मृत्यू झालेल्या शाळकरी मुलीचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माले गावात पंधरा दिवसांपूर्वी कस्तुरी माणिक चौगुले संध्याकाळी दारात खेळत असताना अचानक रस्त्यावरील भटक्या कुत्र्यानं कस्तुरीवर हल्ला चढवून कस्तुरीच्या चेहऱ्याचा चावा घेतला होता. त्यामुळं तिला तातडीनं कोडोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र दवाखान्यात डॉक्टर उपस्थित नसल्यानं एका नर्सनं कस्तुरीला इंजेक्शन दिलं. 


दुसऱ्या दिवशी पुन्हा माणिक चौगुले कस्तुरीला घेऊन कोडोली उपजिल्हा रुग्णालयात गेले. यावेळी डॉक्टरनी तपासून तिला इंजेक्शन दिले आणि पुन्हा 23 मे आणि 31 मे रोजी इंजेक्शन घेण्यासाठी यायला सांगितलं. त्यानंतर एक जून पासून कस्तुरीमध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागली.
 
त्यामुळं 2 जूनला कस्तुरीला सीपीआर मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे कस्तुरीचा मृत्यू झाला. कुत्र्याने कस्तुरीच्या गाल आणि ओठाचा चावा घेतल्यामुळे रेबीजची लागण रोखण्यासाठी जखमांच्या ठिकाणी इंजेक्शन देणे गरजेचे होतं. पण कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांनी कस्तुरीला दंडात इंजेक्शन दिलं. 


त्यामुळं कोडोली उपजिल्हा रुग्णालयात कस्तुरीवर योग्य उपचार झाले नसल्यानं कस्तुरीचा मृत्यू झाल्याचा आरोप कस्तुरीचे वडील माणिक चौगुले यांनी केला आहे


भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा ग्रामस्थांची मागणी
गावात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातलं असून अनेक लोकांवर हल्ले केले आहे. त्यामुळं गावातील भटक्या कुत्र्यांचा ग्रामपंचायतीनं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थां मधून होत आहे.


उपचारामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सवर कारवाईची मागणी
शिवसेनेच्या वतीने कस्तुरीच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील अभिवंत यांना निवेदन देण्यात आले, यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.सुनील अभिवंत यांनी घडलेल्या प्रकाराची गांभीर्याने चौकशी करुन दोषीं वर कारवाई करण्याच आश्वासन दिलं आहे.