रायगडमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. 5 ते 6 भटक्या कुत्र्यांनी मुलावर हल्ला केला. महाड तालुक्यातील धामणे बौद्धवाडी येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली. समर प्रभाकर असं या मुलाचं नाव असून तो तिसरीत शिकतो आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समर  दुपारच्या सुट्टीत शाळेतून घरी जात असताना कुत्र्यांची झुंड त्याच्या अंगावर चालून गेली. तो पळत असताना कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला आणि यावेळी शरीराचे अक्षरशः लचके तोडले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. त्याला तातडीने मुंबईच्या जे जे रुग्णालयात हलवण्यात आले असून तिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण असून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांकडून होत आहे.


पुण्यात 14 हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा


पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे विविध समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. कुत्र्यांची संख्या घटल्याचा दावा पालिकेने केला असला, तरी गेल्या 9 महिन्यांत शहरात कुत्र्यांनी 14 हजारांहून अधिक नागरिकांना चावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे कुत्र्यांना रेबीजची लस देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.