रत्नागिरी / सिंधुदुर्ग : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, कोकणातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी कोकण किनाऱ्यावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून मासेमारीसाठी समुद्रात कोणी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी किनारपट्टी भागात रिमझिम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात ४० किलोमीटर वेगाने वारे वाऱ्यामुळे मच्छिमारीला ब्रेक लागला आहे. नागरिकांनी समुद्राच्या जवळ जाऊ नये, असा प्रशासनाने इशारा दिला आहे. आज दिवसभर वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.



तर सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मच्छिमार बांधवांनी समुद्रात न जाण्याचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या २४ तासात ते  दिनांक १७ ऑक्टोबर २०२० रोजीपर्यंत किनारपट्टीवर ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली आहे.


जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच मेरीटाईम बोर्डाकडून दोन नंबरचा बावडा लावण्यात आलेला आहे. जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.