अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : मुल्यांकनामुळे अनेक विद्यार्थ्यांना भरघोस मार्क मिळाले. पण, काही विद्यार्थ्यांना त्याचा तोटाही झाला. मुल्यांकनाचे अधिकार शाळांकडे देण्यात आल्याने फीच्या नावाखाली शाळांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक धक्कादायक प्रकार अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये घडला आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा गावात राहणारा आदित्य काळमेघ या विद्यार्थ्याला केवळ शाळेची पूर्ण फी भरली नाही म्हणून कमी मार्क दिल्याचा आरोप आदित्यने केला आहे. 


कोरोनामुळे वडिलांची आर्थिकस्थिती बिघडली आणि शाळेची 31 हजार 500 रुपयांची फी भरणं अभ्यासात हुशार असलेल्या आदित्याला जमलं नाही. कसेबसे पैसे जमवून 2300 रुपये भरले. पण, उर्वरित फी न भरल्याने शाळेनं फक्त 52 टक्के गुण देऊन पास केल्याचा आरोप आदित्यनं केला आहे.


आदित्यला सातवीत 81%, आठवीत 83% आणि नववीत 81% टक्के मार्क्स होते. पण असं असतानादेखील शाळेनं आदित्यला 10 वीला केवळ 52 टक्केच गुण दिले. गेल्या तीन वर्षांची टक्केवारीच आदित्यची हुशारी दाखवत आहे. तरीदेखील शाळेनं दहावीला कमी मार्क कसे दिले असा सवाल आदित्यच्या कुटुंबीयांनी केला आहे.


मुलाचं शैक्षणिक नुकसान टळावं आणि त्याचं योग्य मुल्यांकन व्हावं यासाठी मोटरसायकल विकून शाळेला पैसे देण्याची तयारी दर्शवल्याचं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. 


दुसरीकडे आदित्यने केलेल्या आरोपात तथ्य नसून, नियमानुसारच निकाल दिल्याचा दावा शाळेच्या प्राचार्यांनी केला आहे. सीबीसीने दिलेल्या गाईडलाईननुसारच निकाल लावण्यात आल्याचं शाळेचं म्हणणं आहे.


शाळेनं आरोप फेटाळले असले तरी आदित्य या मनमानीचा बळी ठरलाय. अशा मुजोर शाळांकडे सरकार चाप लावण्यात अपयशी ठरल्यामुळेच शाळांचं फावतं आणि विद्यार्थ्यांचं कधीही न भरून येणारं नुकसान होतं आहे.