Maratha Reservation: राज्यभर मराठा आंदोलनाचा वणवा पेटला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी जाळपोळ होत आहे. राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ला करण्यात येत आहे.  या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मराठा आंदोलनाला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. अशातच सातारा जिल्हातील विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी भलताच निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होवू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व शाळांमध्ये सामाही परिक्षा सुरु आहेत. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील  दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी परीक्षेवरच बहिष्कार टाकला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही, असा निर्धारच या विद्यार्थ्यांनी केला आहे. 


साता-यात दहीवडीत मराठा विद्यार्थी आक्रमक झालेत. महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय घेतलाय. तसंच परीक्षेवर देखील बहिष्कार टाकलाय. आरक्षण द्या, नाहीतर पेपर नाय या घोषणांनी परिसर दुमदुमलाय. अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेत.


शाळेबाहेरच विद्यार्थ्यांची घोषणाबाजी


परीक्षेवरच बहिष्कार टाकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी शाळेबाहेरच घोषणाबाजी केली. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, जय शिवाजी जय भवानी, आरक्षण नाही तोपर्यंत शाळा नाय अशी घोषणाबाजी या विद्यार्थ्यांनी केली. शालेच्या बाहेर जमत विद्यार्थांनी  आंदोलन करत मनोज जरांगे पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.


या विद्यार्थ्यांचं काय काय करायचं?


आरक्षण नसेल तर शिकून काय उपयोग. सवलत नसल्याने उच्च शिक्षण घेण्याची आमची ऐपत  नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत परीक्षा देणार नाही आणि शाळेत देखील जाणार असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला. पेपरच दिला नाही मग आता विद्यार्थांना परीक्षेत पास कसं करायचं असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. 


मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर


मराठा आरक्षणासाठी सर्व स्तरातून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. लातुरमध्ये दयानंद महाविद्यालयातील विद्यार्थी ही रस्त्यावर उतरले होते. दयानंद महाविद्यालया समोरच्या लातूर बार्शी रस्त्यावर विद्यार्थ्यांनी उतरत आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कमी कालावधीमध्य मोठ्या संख्येने जमा झालेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या चक्काजामुळे पोलिसांची प्रचंड धावपळ झाली आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनीचाही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मनोज जारंगें पाटलांना पाठिंबा देणारे बॅनर हातात घेत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली