पुणे : पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. तब्बल तीन तासांनंतर ही आग नियंत्रणात आली. आग लागलेल्या इमारतीतून ६ जणांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलीय. तसंच या इमारतीत कोणत्याही प्रकारचं उत्पादन सुरू नसल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलीय. त्यामुळे कोविशिल्ड लसींना कोणताही धोका पोहचला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेबाबत कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महापालिका आयुक्तांशी संपर्क साधला आणि आगीबाबत संपूर्ण माहिती घेतली.


पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे मृतांमध्ये बांधकाम मजूर असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.