Bacchu Kadu: बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यात यश? मुख्यमंत्र्यांची कडू,अडसूळ कुटुंबासोबत चर्चा
Bacchu Kadu : अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अमरावतीतील तिढा सोडवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Bacchu Kadu : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. अखेर मविआचा (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळतेय. मात्र महायुतीच्या जागांचा तिढा कायम असल्याचं दिसून येतंय. अशातच अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अमरावतीतील तिढा सोडवण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीचा अमरावतीचा तिढा अखेर सुटला?
महायुतीतला अमरावतीचा तिढा सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात आली होती. त्यानुसार बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबासोबत मुख्यमंत्री शिंदेंची बैठक पार पडली. या बैठकीत बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबाची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अमरावतीत नवनीत राणांना उमेदवारी देण्यावरुन बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कडू आणि अडसूळांची समजूत मुख्यमंत्र्यांनी घातली.
बैठकीनंतर बच्चू कडू काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आमदार बच्चू कडू म्हणाले की, वर्धा आणि वाशिम या मतदारसंघा संदर्भात चर्चा करण्यात आली. तसंच नवनीत राणांच्या उमेदवारीविषयी चर्चा करण्यात आली. त्यामुळे जर अमरावतीतून राणा उमेदवार असतील तर आम्हाला बंड करावं लागेल. याच कारणासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. जर अमरावतीतून नवनीत राणा उमेदवार असतील तर आम्हाला युतीतून बाहेर पडण्याची संमती द्या, असं मत आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी येत्या 4 तारखेला पुन्हा बैठक घेण्याबाबत आश्वासन दिलं आहे.
अमरावतीतून कोणाला मिळणार तिकीट?
अमरावती लोकसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र आगामी लोकसभा निवडणूकीसाठी अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते होती. परंतु महायुतीत असणारा प्रहार पक्ष नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी महायुतीकडून नवनीत राणांची उमेदवारी मान्य नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं होतं.