मुंबई : भाजपमध्ये ओबीसी समाजाचे महत्वाचे नेते सध्या नाराज आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी ही खदखद बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे कोणता नेता कधी आपली नाराजी व्यक्त करेल ? हा भाजप नेतृत्वासमोरचा कळीचा मुद्दा झालाय. दरम्यान नुकतीच भाजपच्या विधिमंडळाची बैठक झाली असून त्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित होते. यानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा होऊ लागली होती. यावर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी नाराज नसून वैयक्तिक कारणांमुळे भाजप विधिमंडळच्या बैठकीला हजर नव्हतो, तशी परवानगी घेतली होती असं सुधीर मुनगंटीवार यांनी झी 24 तासशी बोलतांना स्पष्ट केलं आहे. भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पक्षाची बैठक विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप आणि मित्रपक्ष यांची बैठक झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित होते.



एकीकडे पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांचे नाराजी नाट्य समोर आलं असतांना मुनगंटीवार यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर संध्याकाळी 5 च्या सुमारास फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची मुनगंटीवार यांच्याबरोबर सुमारे पाऊण तास चर्चा झाली. 


दरम्यान बैठकीनंतर सावरकर यांच्या बदनामीचा मुद्दा विधिमंडळमध्ये भाजपतर्फे उठवला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.