महाराष्ट्र हादरला! शेतकऱ्याने आधी त्याच्या शेतातला ऊस पेटवला, मग पुढे जे केलं, ते ऐकून तुम्ही पेटून उठाल...
महाराष्ट्रात विरोधक-सत्ताधारी सत्तेसाठी एकमेकांचे लचके तोडतायत, दुसरीकडे ऊस कारखाना घेत नसल्याने त्याने आधी ऊस पेटवला आणि मग जे केलं, ते ऐकून तुम्ही पेटून उठाल...
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : महाराष्ट्रात सध्या विरोधक आणि सत्ताधारी सत्तेसाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र जैसे थेच आहेत. अवकाळी पाऊस, पाणी टंचाईने शेतकरी त्रस्त आहे. पीकाला भाव नाही, हातचं पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीए.
अशीच एक महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. कारखाने ऊस नेत नसल्याने स्वतः उसाचा फड पेटून शेतकऱ्याने उसाच्या फडातच आत्महत्या केल्याची मन सून्न करणारी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव इथला हा धक्कादायक प्रकार आहे. गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील उसाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस लागवड केली.
उसाचे क्षेत्र या वर्षी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने यावर्षी आपल्याला चांगला पैसा मिळेल अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी बाळगून होता. पण कारखानदार आणि शेतकरी यांच्यात संवाद नसल्याने उसाचं हजार हेक्टर क्षेत्र अजूनही तोडणी विना उभं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव इथल्या नामदेव जाधव या शेतकऱ्याने कारखाने ऊस नेत नसल्यामुळे टोकाचं पाऊल उचललं. नैराश्यातून नामदेवने आपला ऊस स्वतः पेटवून दिला. त्यानंतर ऊस पेटवल्याचं त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करुन सांगितलं. नातेवाईकांना त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.
पण नामदेव पूर्णपणे हताश झाला होता, त्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नामदेवच्या आत्महत्येने संपूर्ण गाव हळहळलं. उसाचा प्रश्न गंभीर होत असताना शासन याकडे लक्ष देत नाहीए, परिणामी शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नसल्याचं गावातील इतर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे प्रशासन आणि कारखानदारांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढायला हवा किमान शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई भरून निघेल एवढी मदत सरकारने तात्काळ जाहीर करण्याची गरज आहे.