प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : यंदा ऊसाचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरला सुर होणार आहे. त्यामुळे यंदा उसाला दर काय मिळणार याचा विचार शेतकरी करतायत. तर, शेतकरी संघटनेचे नेते काय दर मागायचा? याचं गणित करण्यात व्यस्त आहेत. तिसरीकडे साखर कारखानदार हे बाजारपेठेत साखरेचे दर काय रहाणार याकडे डोळे लावून बसले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीनंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना ऊस हंगामाचे वेध लागतात. मात्र, दिवाळीपूर्वीच ऊसाला यंदा दर काय मिळणार याची जोरदार चर्चा शेतकऱ्यांत सुरु होते.


नेहमी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये ऊसाला दर काय मागायचा हे ठरत होतं. पण स्वाभिमानीतून हाकालपट्टी झाल्यानंतर स्वतःची रयत क्रांती संघटना काढलेले राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इचलकरंजीत शेतकरी मेळावा घेऊन, FRP अधिक तिनशे रुपये असा दर मिळायला पाहिजे अशी मागणी करुन ऊसदराच्या चर्चेला सुरवात केली आहे.


तर, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी २८ ऑक्टोबरच्या जयसिंगपूरमधल्या ऊस परिषदेमध्ये ऊसाला किती रुपये दर मागणार याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. त्याचवेळी साखर कारखानदार मात्र, यंदा साखरेचे बाजारपेठेत भाव कसे राहतील याचा विचार करत आहेत.



त्यामुळं यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना FRP सोडून अधिकचे किती पैसे मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.