प्रशांत परदेशी, नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये डॉ. सुहास नटावदकर यांनी बंड केलं आहे. नटावदकर कुटुंब १९५२ पासून संघ परिवाराशी जोडलेलं आहे. त्यामुळे या कुटुंबाचं बंड भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. हे बंड शमवण्यासाठी आता पुन्हा गिरीश महाजनांना संजीवनी आणावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदुरबार लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांनी मुलाला उमेदवारी न मिळाल्यानं बंडाचा झेंडा उभारला. भरत गावीत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं जाहीरही केलं. मात्र गावितांचं हे बंड काँग्रेसनं मुंबईत शमवलं. 


काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीमुळे नंदुरबार मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. आता पुन्हा हा मतदारसंघ चर्चेत येतोय तो भाजपत सुरु झालेल्या बंडाळीमुळे. भाजपचे जेष्ठ नेते सुहास नटावदकर यांच्या मुलीने पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत भाजपमधीलल असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. कुटुंबाच्या एकनिष्ठेला पक्षानं न्याय द्यावा अशी मागणी डॉ समिधा नटावदकर यांनी केली आहे. 


नंदुरबार जिल्ह्यात आजही जुनी भाजपा आणि डॉ गावित कुटुंबीय प्रणित भाजप असे दोन गट आहेत. या गटातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न डॉ विजयकुमार गावित करीत आहेत. समेट घडविली जात असतानाच डॉ समिधा यांनी उमेदवारी अर्ज खरेदी करून विद्यमान भाजपा खासदार डॉ. हीना गावित यांच्या पुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.


भाजपमधील हा असंतोष दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन यांना नंदुरबारमध्ये यावं लागणार असं चित्र नंदुरबारमध्ये निर्माण झालं आहे. वेळीच हे बंड न शमवल्यास भाजपासाठी नंदुरबारची निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे.