माझे लाड करायला कुठल्याही आजोबांची गरज नाही- सुजय विखे पाटील
राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा सोडायला नकार दिल्यामुळे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नगर: माझे लाड करायला कुठल्याही आजोबांची गरज नाही. नगरमधील जनतेने माझे लाड पुरवले आहेत, असा टोला सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे अहमदनगरमधील लढत कधी नव्हे इतकी रंगतदार झाली होती. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना शाब्दिक चिमटा काढला होता. आपल्या मुलाचा हट्ट ज्याचा त्यानं पुरवावा. दुसऱ्यांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, असे पवारांनी म्हटले होते.
देशात पुन्हा 'मोदीनामाचा' गजर; काँग्रेसची दैना
शरद पवारांचे हे विधान यंदाच्या निवडणुकीत चांगलेच गाजले होते. यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्यासाठी अहमदनगरमधील विजय अत्यंत महत्त्वाचा होता. अखेर सुजय यांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना २,८१,४७४ मतांनी धूळ चारत विजयश्री खेचून आणली. यानंतर त्यांनी आपला हा विजय आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांचा समर्पित असल्याचे म्हटले. आपण १९९१ साली झालेल्या आजोबांच्या पराभवाचा वचपा काढल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपले लाड करण्यासाठी कुठल्याही आजोबांची गरज नसून जिल्ह्यातील जनतेने लाड केल्याचा खोचक टोलाही सुजय विखे यांनी पवारांना लगावला.
आता विधानसभा लढवूनच राजकारणातूनच संन्यास घ्या; गडकरींचा नाना पटोलेंना टोला
राज्यातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी २३ जागांवर भाजप, १८ जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेस व अपक्ष उमेदवार प्रत्येकी एका जागेवर विजयी झाला. तर औरंगाबादमध्ये 'एमआयएम'च्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना धूळ चारली. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला.