देशात पुन्हा 'मोदीनामाचा' गजर; काँग्रेसची दैना

पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन नेत्यांनाच अशी कामगिरी जमली होती.

Updated: May 24, 2019, 11:55 AM IST
देशात पुन्हा 'मोदीनामाचा' गजर; काँग्रेसची दैना title=

नवी दिल्ली: १७ व्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) पुन्हा एकदा देदिप्यमान कामगिरी करत विरोधकांसह सर्वांनाच आश्चर्याने तोंडात बोटे घालायला भाग पाडले. तर दुसरीकडे मोदी त्सुनामीपुढे काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि अन्य विरोधक भुईसपाट झाले. 

लोकसभेच्या एकूण ५४२ जागांपैकी एनडीएला ३५१ तर यूपीएला ९१ जागा मिळाल्या. यामध्ये भाजप व काँग्रेसला अनुक्रमे ३०३ आणि ५२ जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता काबीज करण्याची किमया करून दाखवली आहे. तर नरेंद्र मोदी हे पाच वर्षांची टर्म पूर्ण करून पुन्हा बहुमताने सत्तेत येणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन नेत्यांनाच अशी कामगिरी जमली होती. 

या निवडणुकीत विरोधकांनी राफेल विमान खरेदी गैरव्यवहार, रोजगार, हुकूमशाही अशा मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केले होते. मात्र, निवडणुकीचे निकाल पाहता जनतेने हे सर्व मुद्दे नाकारून नरेंद्र मोदी यांच्या 'राष्ट्रवादा'ला भरभरून प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले. केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही मोजकी राज्ये वगळता संपूर्ण देशात भाजप आणि घटकपक्षांचे निर्विवाद वर्चस्व दिसून आले. यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) युतीमुळे राजकीय चमत्काराची अपेक्षा असलेल्या उत्तर प्रदेशातही भाजपने अपेक्षित यश मिळवण्याची किमया साधली. 

याशिवाय, मोदींविरोधात जबरदस्त आघाडी उघडणाऱ्या ममता बॅनर्जी यांना तर भाजपने त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्का दिला. सन २०१४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये फक्त दोन जागा जिंकणाऱ्या भाजपने राज्यात ४२ पैकी १८ जागांवर मुसंडी मारली असून तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर समाधान मानावे लागले.

राष्ट्रीय पातळीवरील या निकालांचे प्रतिबिंब महाराष्ट्रातही दिसून आले. राज्यातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी २३ जागांवर भाजप, १८ जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेस अवघ्या एका जागेवर विजयी झाली. तर औरंगाबादमध्ये 'एमआयएम'च्या इम्तियाज जलील यांना विजय मिळाला. राज्यात शिवसेना-भाजपच्या जोरदार मुसंडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी पुन्हा एकदा निष्प्रभ ठरली. तर केवळ चंद्रपूरात एकमेव जागा जिंकून कशीबशी लाज वाचवणाऱ्या काँग्रेस पक्षावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. यामध्ये अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर कारणीभूत ठरला.