आता विधानसभा लढवूनच राजकारणातूनच संन्यास घ्या; गडकरींचा नाना पटोलेंना टोला

आपण नितीन गडकरी यांना पाच लाखांच्या मताधिक्याने हरवू, असा दावाही त्यांनी केला होता.

Updated: May 24, 2019, 08:46 AM IST
आता विधानसभा लढवूनच राजकारणातूनच संन्यास घ्या; गडकरींचा नाना पटोलेंना टोला title=

नागपूर: नाना पटोले यांनी लोकसभेत पराभूत झाल्यानंतर आता विधानसभा निवडणूक लढवावी. यानंतरच राजकारणातून संन्यास घ्यावा, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला. नागपूर लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नाना पटोले यांनी यंदा नागपूर मतदारसंघातील लढत अत्यंत प्रतिष्ठेची केली. याठिकाणी आपण नितीन गडकरी यांना पाच लाखांच्या मताधिक्याने हरवू, असा दावाही त्यांनी केला होता. तसेच नागपुरातून गडकरी निवडून आले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असेही त्यांनी म्हटले होते. 

मात्र, लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नाना पटोले यांचा हा दावा सपशेल खोटा ठरल्याचे दिसून आले. नितीन गडकरी यांनी त्यांना २,१६,००९ मतांनी धूळ चारली. या विजयानंतर नितीन गडकरी यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधला. त्यावेळी गडकरींनी म्हटले की, नाना पटोले यांनी आता राजकीय संन्यास घेण्याऐवजी विधानसभा लढवावी. त्यात पराभूत झाल्यावर मग संन्यास घ्यावा, असे गडकरींनी म्हटले. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांनी आधी घोषित केल्याप्रमाणे सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे', असे आवाहन केले.

देशात पुन्हा 'मोदीनामाचा' गजर; काँग्रेसची दैना

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा पत्रकारांनी याच मुद्द्यावरून गडकरींना विचारणा केली. तेव्हा गडकरींनी राजकीय परिपक्वता दाखवत म्हटले की, राजकारणात जय-पराजय होतच असतात. त्यांनी संन्यास घेऊ नये. जनतेची कामे करावी. विरोधक म्हणून भूमिका पार पाडावी, असे म्हटले. यावर नाना पटोले यांनीही प्रत्युत्तर दिले. राजकीय संन्यास घ्यायचा की नाही हे नंतर बघू. सामाजिक काम करण्यापासून मला कुणीही रोखू शकणार नाही, असे पटोले यांनी सांगितले.

आता निवडणूक लढवावी की नाही, हा प्रश्न पडलाय- नारायण राणे