आशीष अम्बाडे, झी मीडिया,चंद्रपूर : उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत आहे. चंद्रपुरात तर पारा ४७ अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांची उन्हाने काहीली होत आहे. दरम्यान, नागरिकांची होणारी तगमग विचारात घेता चंद्रपुरातील एका उत्साही आणि होतकरू तरूणाने वेगळीच मोहीम हाती घेतली आहे. या तरूणाने चक्क दुचाकीवर फिरती पाणपोई सुरू केली आहे. विशेष म्हणजे ही पाणपोई पूर्णपणे निशुल्क आहे. काय आहे ही सुखवार्ता घ्या जाणून...


चंद्रपुरकरांकडून उपक्रमाचे कौतुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर शहराचे तापमान ४७ डिग्रीकडे वाटचाल करत आहे. अंगाची लाही आणि घशाला कोरड पाडणाऱ्या या उन्हात जवळचे पाणी संपले तर कधीकाळी चौका-चौकात उभ्या राहणाऱ्या पाणपोया मात्र दिसेनाशा झाल्या आहेत. जवळ रक्कम नसताना थंड पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी पैसे नसतील तर....? या तहानलेल्या प्रश्नाचे उत्तर एका चंद्रपूरकर सेवाभावी तरुणाने दिले आहे. त्याने आपल्या दुचाकीवर चक्क फिरती निशुल्क पाणपोई सुरु केली आहे. वर्दळीच्या ठिकाणी ही गाडी उभी केली की हे थंडगार पाणी हा हा... म्हणता संपत आहे. चंद्रपुरात सध्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


तरूणाच्या उपक्रमामुळे अनेकांची 'तृष्णातृप्ती'


सुनील तिवारी हे आहे चंद्रपूरच्या उपक्रमशील -सेवाभावी युवकाचे नाव. शहराच्या मध्यभागी राहणा-या सुनील तिवारी याना पूर्वी चौका-चौकात उभ्या राहणा-या निशुल्क पाणपोया आताशा उभ्या राहत नसल्याचे दु:ख होते. अशी सुविधा नसल्याने शहरात बाहेरगावहून येणा-या हजारो नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापस्त होते. रोज कामानिमित्त घरातून निघताना स्वतःसाठी पाण्याची बाटली घेतानाच इतर तहानलेल्याचे काय ? हा प्रश्न होताच. ही अडचण लक्षात घेता सुनील तिवारी यांनी एक शक्कल लढविली. त्यांनी आपल्या दुचाकीवर खास सोय करून घेतली. कामानिमित्त जिथे जायचे तिथे या दुचाकीवर  थंडगार can ठेवायच्या. पहिल्यांदा हा उपक्रम लोकांना जरा विचित्र वाटला मात्र त्याची उपयुक्तता लक्षात  आल्यावर लोकांनी उपक्रम आपलासा केला. तहानलेले चंद्रपुरकर जसे पाणी पिउन धन्यवाद देत आहेत तसा उपक्रमाला पडेल तशी आर्थिक मदतही करत आहेत. रोज याच पद्धतीने सुमारे शेकडो  लिटर पाण्याची सेवा सुनील तिवारी यांच्या हातून घडत आहे. केवळ तृष्णातृप्तीच नव्हे तर या खास बनवून घेतलेल्या लोखंडी फ्रेमवर पाणी बचतीचे संदेश लिहून पाण्याचे महत्व बिंबविले जात आहे.