धरणात xx का? च्या अफाट यशानंतर दादांचा नवा डायलॉग; अजित पवारांवर सुषमा अंधारेंचा निशाणा
निधीवाटपावरुन पुन्हा एकदा महायुतीत खडाखडी झाल्याचं समोर आलंय.. मंत्रिमंडळ बैठकीत अर्थमंत्री अजित पवार आणि काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं समजतंय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील अजित पवार टीका केली आहे.
Sushama Andhare On Ajit Pawar : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीच्या मंत्र्यांमध्येच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा निधीवाटपावरुन असंतोष उफाळून आलाय. विकास कामांसाठी मंत्र्यांनी निधीची मागणी केल्यानंतर अजित पवार संतापले. निधीवरुन सुरु असलेल्या या वादावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावित या मंत्र्यांनी विकास कामांसाठी निधीची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती...निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आला... आपल्याकडे एवढ्या योजना जाहीर केल्या आहेत आता निधी कुठून देऊ? आता काय जमिनी विकून निधी देऊ का? असं उत्तर अजित पवारांनी मंत्र्यांना दिलंय... त्यामुळे अजित पवारांच्या उत्तरानंतर मंत्रीही नाराज झाले.. बावनकुळेंनी मात्र यावरुन अजितदादांची पाठराखण केलीय...मंत्र्यांनी आता अजित पवारांबाबतची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्याचं समजतंय..मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं?
अजित पवारांच्या गटातील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघातील स्मारकासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनीच मंत्रिमंडळात मांडला होता. मात्र त्यावरुन महाजनांनी इथे खर्च कशाला असा प्रश्न उपस्थित केल्याचं समजतंय. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत वातावरण गरम झालं होतं. आता तरी सुधारा, नाहीतर निवडणुकीनंतर रस्त्यावर यावं लागेल असा इशारा माणिकराव कोकाटेंनी दिलाय.. निधी वाटपावरून शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनीही महायुतीला घरचा अहेर दिलाय.
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी अजित पवारांनावर निशाणा साधलाय.. धरणाबाबतच्या सुप्रसिद्ध डायलॉगच्या यशानंतर दादांचा नवा डायलॉग... "तिजोरीत निधी नाही तर आता जमीन विकू का ?" दादा जीनियस आहेत असं म्हणत अंधारेंनी अजित पवारांना टोला लगावलाय.
धरणात पाणी नाही तर आता धरणात xx का?
च्या अफाट यशानंतर दादांचा नवा डायलॉग
"तिजोरीत निधी नाही तर आता जमीन
विकू का ?"
तुम्ही काहीही म्हणा.. दादा इजै जीनियस..!! असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला... विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जास्तीत जास्त निधी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न महायुतीतले आमदार आणि मंत्री करतायत. मात्र त्यातूनच आता महायुतीत वादाच्या ठिणग्या पडू लागल्याचं चित्र दिसतंय.