Crime News: मुंबईत हॉस्टेल रुममध्ये विद्यार्थिनीचा नग्न मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मरिन ड्राइव्ह परिसरात असणाऱ्या उच्चभ्र वस्तीतील हॉस्टेलमध्ये या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. हे हॉस्टेल राज्य सरकारकडून चालवलं जात आहे. पोलिसांचा याप्रकरणी 30 वर्षीय ओम प्रकाश कनौजिया याच्यावर संशय होता. हत्या झाल्यापासून तो फरार होता. मात्र घटनेनंतर काही वेळातच त्याने ट्रेनसमोर झोपून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मुंबईत पोलीस जिमखान्याजवळ असणाऱ्या सावित्रीबाई फुले महिला हॉस्टेलमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून तिथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


पोलिसांना विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशय आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच बलात्कार झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल. पीडित मुलगी वांद्रे उपनगरातील एका सरकारी पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी होती.


नेमकं काय घडलं?


मुंबईत वास्तव्यास असणारी विदर्भातील 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने पोलिसांना कळवण्यात आलं. मंगळवारी संध्याकाळपासून मुलगी बेपत्ता होती. मरिन ड्राइव्हच्या हॉस्टेलमधील चौथ्या माळ्यावर असणारी तिची रुम बाहेरुन बंद होती. यानंतर पोलीस हॉस्टेलमध्ये पोहोचली. पोलिसांनी दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला असता तरुणी मृतावस्थेत पडलेली होती. तिच्या गळ्याभोवती दुपट्टा गुंडाळलेला होता. 



"आम्हाला सावित्रीबाई वसतिगृहातील एक मुलगी बेपत्ता असून तिच्या खोलीला बाहेरून कुलूप लावले असल्याची माहिती आम्हाला मिळाली. घटनास्थळी पोहोचून पाहिलं असता, तिच्या ती आतमध्ये मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती दुपट्टा गुंडाळलेला होता. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचा संशय आहे. वसतिगृहात काम करणारा एक माणूस घटना घडल्यापासून फरार आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत," अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली आहे. 


पोलिसांना संशयित आरोपीचा ठावठिकाणा सापडत नव्हता. यामुळे त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. 



संशयितासमोर ट्रेनने मारली उडी


आरोपीला पकडण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख आणि मरीन ड्राईव्हचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश बागुल यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं होतं. या पथकात अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास जवळच्या रेल्वे स्थानकावर संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


असं सांगितलं जात आहे की, ओम प्रकाश कनौजियाने हॉस्टेलच्या मागील बाजूस असणाऱ्या चर्नी रोड रेल्वे स्थानक गाठलं आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मजवळील ट्रॅकवर जाऊन झोपला. यावेळी ट्रेन अंगावरुन गेल्याने त्याचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जी टी रुग्णालयात पाठवला आहे.