प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा, जादूटोणासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. याचं एक ज्वलंत उदाहरण भंडारामध्ये समोर आलं आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एका महिलेची हत्या करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
जादूटोना करत आपल्या पत्नीला मारल्याच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या मदतीने 45 वर्षीय महिलेची काठिने हल्ला करत हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नवेगाव इथं समोर आली आहे. या प्रकरणी दोनही आरोपींना अटक करण्यात आली असून राजहंस कुंभरे आणि विनोद रामटेके अशी त्यांची नावं आहेत.


कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव परिसरात कपडे धुवायला गेलेल्या बबिता तिरपुडे या महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला.  डोक्यावर काठी मारून आणि गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं होतं.
 
याप्रकरणी कारधा पोलिसांनी दोन आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपी राजहंस कुंभरे याने बबिता तिरपुडे हिचा खून केल्याचं कबुल केलं. बबिता तिरपुडे ही जादूटोणा करत असल्याचा त्याला संशय होता. जादूटोना केल्यामुळे पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाल्याचं त्याचं म्हणणं होतं. हा राग मनात धरून बदला घेण्यासाठी बबिता तिरपुडेची हत्या केल्याची कबुली आरोपी विनोद रामटेके याने दिली.


याप्रकणी दोन्ही आरोपींना कारधा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास कारधा पोलिस करीत आहे.