ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी पुन्हा सुरू
देश-विदेशातील पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश रविवारपासून सुरू झालेत.
चंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश रविवारपासून सुरू झालेत.
एनटीसीएने ठरवलेल्या १५ ऑक्टोबरच्या डेडलाईनपूर्वीच प्रवेशाला होकार देत व्याघ्रप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांना जणू विजयादशमीचे गिफ्ट दिले. विशेष म्हणजे हा निर्णय होताच ताडोबाची बुकींग हाऊसफुल्ल झाली. पट्टेदार वाघाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक ताडोबाला येत असतात. अगदी मागील वर्षापर्यंत ताडोबा हा एकमेव प्रकल्प देशातील मान्सून काळात सुरू राहणारा प्रकल्प होता.
मात्र यंदा राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने अगदी अचानक निर्णय घेत १ जुलैपासून ताडोबा बंद राहील असे आदेश काढले. त्यामुळे टूर गाईड्स, जिप्सी मालक, हॉटेल रिसॉर्ट मालक आणि पर्यटकांवर अवलंबून असलेले सर्व घटक प्रकल्प बंदीमुळे अडचणीत आले होते. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा पावसाळा निम्माच बरसला आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात प्रकल्पात पाण्याअभावी मोठे संकट ओढवू शकणार आहे. ही परिस्थिती बघता ताडोबातील प्रवेश १५ दिवस आधी सुरु करून अधिक संख्येतील पर्यटकांना आकर्षित करण्याचा मानस आहे.