रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेले आणि तमाशा कलाप्रकारावर हुकूमत गाजविणारे सांगली जिल्ह्यातील कवलापूर इथल्या 'काळू - बाळू'सह राज्यातील सहा मोठे तमाशे बंद पडले आहेत . दोन वर्षे कोरोनामुळे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. त्यातच डिझेलच्या वाढत्या दरामुळे हे तमाशा फड आर्थिक संकटात सापडले होते. तमाशा बंद असल्याने तमाशा कलाकारांना उपासमार आणि आर्थिक चणचण सहन करावी लागतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे पावसामुळे विदर्भ, खानदेशात तमाशाचे प्रयोग ठप्प आहेत. यावर्षी केवळ आठच फड विजयादशमीला रिवाजानुसार लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. पण पावसाचा त्यांना ही फटका बसला असून एक दोन शो करून हे फड विदर्भ आणि खानदेशात बसून आहेत.


हे सहा तमाशा फड बंद
काळू - बाळूसह , अंजली नाशिककर , भिका - भीमा सांगवीकर , कुंदा पाटील - पिंपळेकर , चंद्रकांत ढवळीपूरकर , दत्ता महाडिक पुणेकर असे सहा तमाशांचे फड बंद आहेत. तमाशाला 80 रुपये इतका तिकीट दर आहे. तिकीट काढून तमाशा पाहण्यास येणारा प्रेक्षकवर्गही दिवसेंदिवस खूपच कमी होत चालला आहे. तमाशाला आता केवळ 35 ते 40 प्रेक्षकच येत असतात. या प्रयोगातून जमा होणाऱ्या गल्ल्यातून काहीच खर्च भागत नाही. त्यामुळे हे फड बंद ठेवले आहेत. 


अर्थकारण बिघडलं
संपूर्ण अर्थकारण बिघडल्याने आता जानेवारीत बाहेर पडण्याचे नियोजन सुरू आहे. गावोगावच्या सुरू होणाऱ्या यात्रावर आशा लावून फड मालक बसले आहेत. यात्रा कमिटीकडून 'सुपारी' घेऊन शो करण्याचा निर्णय या सहा फड मालकांनी घेतला आहे. महाराष्ट्रात जवळपास 225 लहान - मोठे फड आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रत्येकवर्षी विजयादशमीला सर्व फड बाहेर पडतात . त्याआधी महिनाभर कलाकारांची जुळवा - जुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरुस्ती, लाईट व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी किमान 15 ते 20 लाख रुपये लागतात.


तमाशात सुरत्या, हलगी, ढोलकी, तुणतुण, पेटीमास्तर, नर्तिका असे ७० ते ८० कलाकार असतात . याशिवाय चालक, क्लिनर, आचारी, व्यवस्थापक असा शंभरजणांचा लवाजमा असतो. लोखंडी स्टेज, तंबू, गेट, चार राहुट्या, जनरेटर, साऊंड सिस्टिम हे साहित्य आणि कलाकारांचा लवाजमा नेण्यासाठी पाच ट्रक आणि एक जीप असते. फडातील सर्वांचे दोनवेळचे जेवण आणि वाहनांतील डिझेल हा सर्व डोलारा सांभाळताना तोटाच होतो. दरवर्षी सावराकडून कर्ज काढून ही रक्कम उभा केली जाते. एकूणच कला जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.