Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह केलेल्या बंडानंतर शिवसेनेतील गळती सुरु आहे. ४० आमदारांसह शिवसेनेच्या १२ खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. याविरोधात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आक्रमक होत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेची अनेकांनी साथ सोडली असली तरी राज्यभरातून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना शिवसेनेसोबत कायम असण्याचे प्रतिज्ञापत्र देण्याचे आवाहन केले आहे.


त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एका शिक्षकाने चक्क आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. या शिक्षकाच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.


दिपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या या शिक्षकाचे नाव आहे. दिपक खरात हे पुण्याच्या वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत होते. शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख खरात यांच्या राजीनाम्यात आहे.


गेली वीस वर्षे दिपक खरात हे  प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत आहेत. शिवसेना पक्षाच्या संघर्षाच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी दिपक खरात यांनी नोकरी सोडत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी शाळा प्रशासनाचे आभार देखील मानले आहेत.


"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दर्शवून शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करणे या कारणास्तव मी माझ्या नोकरीचा राजीनामा स्वेच्छेने आज दिं. 27-07-2022 रोजी देत आहे," असे दिपक खरात यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


"आजवर आपल्या संस्थेचे, शाळा व्यवस्थापनाचे, अधिकारी वर्गाचे, मुख्याध्यापकांचे, सहकारी शिक्षकांचे जे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करुन माझा राजीनामा मंजूर करण्यात यावा ही विनंती करतो," असेही या पत्रात म्हटले आहे