हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर : पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे तर दिलेच सोबत विद्यार्थ्यांच्या पालकांना शेतीचे मार्गदर्शन देऊन त्यांना स्वावलंबी देखील बनवले आहे.पालघर म्हटलं की रोजगारासाठी होणारं स्थलांतर डोळ्यासमोर येते. पण खोमारपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे पालक रोजगारासाठी स्थलांतर करत असल्याने विध्यार्थीही स्थलांतरीत होत होते. याचा परीणाम पट संख्येवर होत होता. मात्र शाळेचे शिक्षक बाबू चांगदेव मोरे यांनी कमाल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षक बाबू मोरे यांनी हे स्थलांतर रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शेती विषयक आवड निर्माण व्हावी यासाठी पाड्यातील पालकांना शेती विषयक मार्गदर्शन करून विविध पिके घेण्यास भाग पाडले. यामुळे विद्यार्थ्याचे स्थलांतर थांबले तसेच पालकांना रोजगाराचे साधन मिळू लागले.



बाबु मोरे या शिक्षकांची २०१३ ला खोमारपाड्याच्या शाळेत बदली झाली. ही शाळा तेव्हा पहिली ते पाचवीमध्ये ८८ पटसंख्येत होती. ते जेव्हा शाळेत हजर झाले तेव्हा लोकांची भात शेतीची कामे जवळजवळ पुर्ण होत आली होती. पालक कामाच्या शोधात बाहेर गावी जाण्याचा तो काळ. पालक बाहेर कामाला जातात हे बरं होत कारण त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न होता. पण पालकांबरोबर शाळेत शिकणारी मुलं ही त्याच्याबरोबर जायची. त्यामुळे पटसंख्या घटत होती.



२०१६ साली गणपती सुट्ट्यांपुर्वी त्यांनी शाळेत पालकांची एक मिटींग घेतली.  या मिटींगसाठी ३५ ते ४० पालक उपस्थित होते. त्यानंतर शाळेतील प्रोजेक्टरवर पालकांना काही शेतीविषयक व्हिडीओ त्यांनी दाखवले. पालकांनी यातून प्रेरणा घेत आणि गुरुजींवर विश्वास ठेवून शेती करण्याचे ठरविले. 


त्या वर्षी गवार, कांदा, वांगी, दुधी, हरबरे, कलिंगड, काकडी, भेंडी, इ. पिकांची लागवड केली. लागवड केल्यावर शाळा सुटल्यावर किंवा कधी सुट्टीच्या दिवशी शेतावर पालकांना या शिक्षकाने वेळोवेळी मार्गदर्शन केले. पालकांना पिकापासून पैसा मिळू लागला होता. 


त्यांच्यामध्ये विश्वासही निर्माण होत होता. या प्रकल्पातून प्रत्येक शेतकर्याला बाहेर जावून काम करण्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते. त्या वर्षापासून या शाळेचा स्थलांतर प्रमाण शून्य झाले. या प्रयत्नाना अक्षरधारा फाउंडेशन-मुंबई यांनी आणखी बळ आणण्याचे काम केले. 



शेजारचे, फणसीपाडा, लयनीपाडा, मुसळपाडा, ठाकरपाडा व खडकीपाडा येथील शेतकर्यांचा एक गट बनवून मिरची, गवार, मेथी, वांगे, कारले, दुधी, डांगर, पालक, टोमँटो, कोबी, काकडी व जवळजवळ ३५ टन कांद्याचे उत्पादन घेऊन पालकांना कोरोनासारख्या आजाराच्या काळातही उत्पन्नाचे साधन मिळवून दिले. १८ कुटुंब कामाच्या शोधात बाहेर जायची त्यांना आशेचा किरण दाखविणाऱ्या तसेच त्यांना आर्थिक पठबळ अक्षरधारा फाउंडेशनने दिले. 


पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागत आजही स्तलातराचा प्रश्न गंभीर असून बाबू मोरे या शिक्षकाने लढवलेली शक्कल खरोखरच कौतूकास्पद अशीच आहे.