Teacher Contractual Recruitment: राज्‍यात सुधारीत शिक्षक संच मान्‍यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्‍या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍याची भूमिका राज्‍य सरकारने घेतली आहे. याला राज्‍यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय. ही अंमलबजावणी सुरू झाल्‍यास राज्‍याच्‍या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्‍य अंधारात जाण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शासनाने हे दोन्‍ही निर्णय रदद करावेत यासाठी राज्‍यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्‍या आहेत. येत्‍या 25 सप्‍टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामुहिक रजा आंदोलन करीत प्रत्‍येक जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात येणार आहे. 


शाळांचा दर्जा घसरून त्‍या बंद पडण्‍याची भीती


नवीन धोरणानुसार 20 किंवा त्‍यापेक्षा कमी पट असलेल्‍या शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्‍यासोबत सेवानिवृत्‍त शिक्षकाची कंत्राटी पदधतीने नेमणूक केली जाणार आहे. यामुळे शाळांचा दर्जा घसरून त्‍या बंद पडण्‍याची भीती शिक्षक संघटनांनी व्‍यक्‍त केलीय. महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक परिषद राज्‍याध्‍यक्ष
राजेश सुर्वे यांनी यासंदर्भात माहिती दिली.


रायगडच्या शाळांना ईदची सुट्टी कायम 


मुस्लिम बांधव आणि पोलिस अधिक्षक रायगड यांच्‍याशी झालेल्या चर्चेनुसार ईद-ए-मिलाद निमित्ताने सोमवारी 16 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रायगड जिल्ह्यात कायम ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारने सोमवारची सुटी रद्द करून ती बुधवारी 18 सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. असे असले तरी रायगड जिल्हा प्रशासनाने 16 सप्टेंबर रोजीची सुटी कायम ठेवली आहे. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांनी आणि संबंधितानी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितलं.


खांदेरी जलदुर्गाच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा


अलिबागच्या समुद्रातील ऐतिहासिक खांदेरी किल्ल्याच्या संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने यासाठी 8 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे हा किल्ला जागितक वारसा स्थळाच्या यादीत आपले नाव कोरण्यासाठी तयार होणार आहे. खांदेरी किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून यापूर्वीच घोषित केला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेशासाठी नामांकन यादीत नाव देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने युनेस्कोच्या तज्ञ पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे. तत्‍पूर्वी किल्‍ल्‍याच्‍या जतन आणि संवर्धनाची कामे केली जाणार आहेत. राज्‍य सरकारच्‍या पुढाकारामुळे खांदेरी किल्ल्याला जागतिक वारसा यादीत स्‍थान मिळण्याच्‍या आशा पल्लवित झाल्या आहेत.