Telangana Election : मुख्यमंत्री शिंदेंनी प्रचार केलेल्या `त्या` भाजपा उमेदवाराचं झालं काय?
Telangana Election Result 2023 : तेलंगणा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवारांचा निकाल हाती आला आहे. मुख्यंमंत्री शिंदे यांनी भाजपाच्या दोन उमेदवारांचा प्रचार केला होता.
Telangana Election Result 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी बीआरएस पक्षाला चांगलाच हादरा बसला आहे. बीआरसला पराभूत करत काँग्रेसने तेलंगणात एकहाती सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे भाजपालाही तेलंगणात फारशी काही कमाल करता आलेली नाही. केंद्रातील बड्या नेत्यांच्या प्रचारानंतरही तेलंगणात भाजपने दोन अंकी आकडा देखील गाठला नाही. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार केलेल्या भाजपाच्या उमेदवारांचे काय झालं याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. भाजपाच्या दोन उमेदरावारांचा प्रचार मुख्यंमत्री शिंदे यांनी केला होता. मात्र आता निकालानंतर चित्र स्पष्ट झालं आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार पायल शंकर आणि एस. कुमार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी मदरांसोबत संवाद साधला होता. पायल शंकर हे आदिलाबाद येथून तर एस. कुमार हे धर्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. मात्र यातील पायल शंकर यांना यश चांगले यश मिळाले आहे. तर एस. कुमार यांचा पराभव झाला आहे.
आदिलाबाद मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या पायल शंकर यांनी भारत राष्ट्र समितीच्या जोगु रमन्ना यांचा पराभव केला आहे. तर काँग्रेसच्या कंदी श्रीनिवास रेड्डी यांना तिसऱ्या जागेवर समाधान मानावं लागलं आहे. आदिलाबाद मतदारसंघात मुख्य लढत ही पायल शंकर आणि बीआरएसच्या जोगु रमन्ना यांच्यातच होती. पायल यांचा 6,692 मतांनी विजय झाला आहे. पायल शंकर यांना 67608 मते मिळालू असून जोगु रमन्ना यांना 60, 916 मते मिळाली आहेत.
तर धर्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या भाजपाच्या कुमार एस यांचा दारून पराभव झाला. तर काँग्रेसच्या अडलुरी लक्ष्मण कुमार यांनी मोठी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला आहे.अडलुरी लक्ष्मण कुमार यांना 91,393 तर कुमार एस यांना केवळ 7345 मते मिळाली आहेत.
प्रचारावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
"राज्यात आणि केंद्रात एकाच विचारांचे सरकार असल्यास राज्याचा विकास जलदगतीने होतो. महाराष्ट्र हे त्याचे उत्तम उदाहरण असून केंद्राच्या सहकार्याने महाराष्ट्रात अनेक विकासप्रकल्प वेगाने सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 50 वर्षांत न होऊ शकलेली कामे 9 वर्षांत पूर्ण केली असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना, महिलांसाठी उज्ज्वला योजना, महिला आरक्षण, देशातील गरीब वर्गाला पुढील 5 वर्षे मोफत रेशन देणे असे निर्णय भाजपने घेतले आहेत. त्यामुळे मोदींच्या भाजपला मत देणे म्हणजे पूर्ण होणाऱ्या आश्वासनांना मतदान करण्यासारखे आहे," असे मुख्यमंत्री प्रचारादरम्यान म्हटलं होतं.