नाशिक : तेलगीने केलेल्या ३५ हजार कोटींच्या मुद्रांक शुल्क गैरव्यवहारातल्या तपासात आता त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. यात तेलगीच्या रेल्वे पोलिसातल्या सहकाऱ्यांचे हात मुक्त झालेत. त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्हं निर्माण होऊ लागलंय. गाडीतून मुद्रांक शुल्क चोरीला गेले. मात्र, चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झालाच नाही. खरे आरोपी सोडून दिले. तर खोटे आरोपी यात अडकविण्यात आले, असा थेट आरोप काही वकिलांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे शासकीय चलन म्हणजे मुद्रांक. प्रत्येक राज्याच्या ट्रेझरीला मागणीनुसार नाशिक सिक्युरिटी प्रेसमधून रेल्वेच्या वॅगनमधून कोट्यवधी रूपयांचे मुद्रांक पुरवण्यात येत असत. ९० च्या दशकात रेल्वे पार्सलमधून रेल्वे पोलीस विभागाच्या मदतीने तेलगीने नाशिक ते भुसावळ दरम्यान ३५ हजार कोटींचे स्टँप चोरी केले. 'झी मीडिया'ने त्यावेळी हा घोटाळा उघड केल्यावर आठ आरपीएफ उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला. या खटल्यात ४९ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र तपासात रेल्वे पोलिसांची जबाबदारी नसताना त्यांच्यावर खोटे गुन्हे लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तर मुद्रांक गहाळ होण्याबाबत कुठेही गुन्हाच दाखल नसल्याचं उघड झाले आहे. 



हे सर्व माहिती असताना रेल्वे पोलिसांनी गुन्हाच का दाखल केला नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. अर्थ मंत्रालय आणि सिक्युरिटी प्रेसचे अधिकारी अशावेळी मूग गिळून का गप्प होते असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे. आता या निकालानंतर सिक्युरिटी प्रेस काहीही करत नाहीये. केंद्रीय अर्थ खातंही याबाबत काहीही बोलायला तयार नाहीये. त्यामुळे यात राजकीय दबाव अथवा सहभाग नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.