नागपूर: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची सुरुवातीपासूनच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करत विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करतील, असा अंदाज आहे. एरवीही हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाच कित्ता गिरवतील, असे सांगितले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'उद्धवजी, शेतकऱ्यांना २५ हजार कधी देणार ?'


दरम्यान, विरोधकांनी ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, या  मागणीचा अंतिम आठवडा प्रस्ताव काल विधानसभेत मांडला होता. या प्रस्तावावर चर्चा होऊन मुख्यमंत्री त्याला उत्तर देतील. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाचा शेवट गोड व्हावा, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा आहे.



यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिक घेत अनेकदा भाजपला अडचणीत आणले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रीपद असतानाही शिवसेनेने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपयांची मदत करण्याची मागणी लावून धरली होती. तसेच निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, ठाकरे सरकार स्थापन होऊन तब्बल २० दिवस उलटल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली नाही. यावरून भाजपने हिवाळी अधिवेशनात शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र, आम्ही लवकरच शेतकऱ्यांना ठोस मदत करू, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते.