ठाणे : ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. मात्र तूर्तास लॉकडाऊन करणार नसल्याचं ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र पुढील आठवड्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर मात्र लॉकडाऊन करण्याबाबत विचार करू, असं त्यांनी सांगितलं आहे. सध्या तरी ठाणे महापालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. दरम्यान, कोरोना नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना डॉ. शर्मा यांनी दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर पोलीस आयुक्तांनी देखील कोरोनाचे नियम न पाळल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. लोकांकडून नियमांचं पालन होत नसताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचं प्रमाण आता वाढू लागलं आहे. ठाणे हा  कोरोनाचा याआधी मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच अचानक पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे.


ठाण्याला लागून असलेल्या कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज कोरोनाचे 145  रुग्ण वाढले आहेत. गेल्या 24 तासात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 997 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 1186 जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61689 वर पोहोचली आहे. केडीएमसी  क्षेत्रात 59,506 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


आज राज्यात कोरोनाचे ६११२ नवे रूग्ण वाढले असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ४४,७६५ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह अकोला,अमरावती, यवतमाळमध्ये आजही रूग्णसंख्येतील वाढ लक्षणीय आहे.