चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धा, जादूटोणासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. याचं एक ज्वलंत उदाहरण ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये समोर आलं आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयातून 75 वर्षांच्या एका वृद्धाला पेटत्या आगीवर नाचवण्यात आलं. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा (Witchcraft) अस्तित्वात आला तरी देखील या कायद्याला धाब्यावर बसवून दिवसाढवळ्या करणी, जादूटोणा आणि भानामतीचे प्रकार असताना उघड होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना
4 मार्च रोजी रात्री  मुरबाड  (Murbad) तालुक्यातील केरवेळे गावात गोधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जागरणाचा गोंधळ सुरू असताना 15 ते 20 जणांचा जमाव त्याच गावात राहाणाऱ्या 75 वर्षांच्या वृद्धाच्या घरात घुसला.  जमावाने त्या वृदधाला घरातून ओढत जागरणाच्या ठिकाणी घेऊन गेले. या ठिकाणी आग पेटवण्यात आली होती. त्या आगीवर या वृद्धाला नाचवलं.  हा वृद्ध करणी करतो या संशयावरुन त्याला मारहाण देखील करण्यात आली. आगीवर नाचविल्याने  त्या 75 वर्षीय वृध्दाचे पाय गंभीररित्या भाजले आहेत. वृद्धाच्या पायाला फोड आले असून पाठिवरही जखमा झाल्या आहेत.


या बाबत या वृद्धाच्या मुलीने मुरबाड पोलिस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हा वृद्ध व्यक्ती जादूटोणा करतो असा गावातील लोकांचा संशय होता.  तसंच त्यांच्या अंगात देव येत असले तर त्यांना आगीवरून चालवल्यावरही काहीही इजा होणार नाही असं गावकऱ्यांना वाटलं, त्यामुळे त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी या वृद्धाला आगीवरुन चालवलं. या घटनेने मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.


भंडारा जिल्ह्यातही अशीच घटना
काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातही अशीच घटना उघडकीस आली होती. जादूटोणा करत आपल्या पत्नीला मारल्याच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या मदतीने 45 वर्षीय महिलेची काठिने हल्ला करत हत्या केली. जादूटोणा केल्यामुळे पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाल्याचं आरोपीचं म्हणणं होतं. हा राग मनात धरून बदला घेण्यासाठी महिलेची हत्या केल्याची कबुली आरोपी विनोद रामटेके याने दिली.  


काय आहे जादूटोणा कायदा?
महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये 'महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियम 2013', हा कायदा संमत केला. हा फौजदारी कायदा आहे. या कायद्याला जादूटोणा विरोधी कायदा, असंही म्हटलं जातं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांनी या कायद्यासाठी 16 वर्षे संघर्ष केला. त्यांनी या कायद्याचा मसुदा तयार केला होता. सरकारने यासंदर्भातील विधेयक विधिमंडळात मांडले. पण त्याला काही राजकीय पक्षांचा विरोध झाल्याने ते 14 वर्षे अडकले होतं.