ठाण्यात बिल्डरच्या मुलाला संपवले; हत्येनंतर तरुणी आणि मित्र इमारतीखाली सिगरेट पित उभे राहिले...
Thane Crime News: ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
Thane Crime News: ठाण्यात एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वयंम परांजपे असं तरुणाचे नाव असून त्याच्यावर कोयत्याचे वार करुन हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तरुणाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रेयसीनेच तिच्या मित्रासोबत मिळून हा कट रचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयुरेश धुमाळ असं आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कोपरी येथील संचार सोसायटीत राहणाऱ्या स्वयंम परांजपे यांच्यावर 50 हून अधिक वार कोयत्याने करण्यात आले आहे. स्वयंमची त्याच्या राहत्या घरातच हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार आणि एक कटर मशीन सापडले आहे. आरोपीने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कटर मशीनदेखील आणले होते. तसंच, इमारतीच्या खाली असलेल्या वॉचमेनची परवानगी घेऊनच तो घरात शिरला होता.
मयत स्वयंम परांजपे हा ठाण्यात बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतो. 28 एप्रिल 2024 साली स्ययंम आणि 20 वर्षांच्या तरुणीची एका लग्नात ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी घेऊन आला. नंतर तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिचे नग्नावस्थेत फोटो काढले. स्वयंम सतत तिला ब्लॅकमेल करत होता. तिला घरी येण्यास धमकावत होता. स्वयंमच्या रोजच्या त्रासाला वैतागून तिने तिचा मित्र मयुरेश धुमाळला सगळी घटना सांगितली.
मयुरेश धुमाळने तरुणीसोबत घडलेली घटना ऐकून तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. दोघांनीही त्याचा जीव घेण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे दोघेही त्याच्या ठाण्यातील घरी गेले. सुरुवातीला दोघांनी त्याला फोटो डिलीट करण्याची विनंती केली. मात्र, स्वयंमने ते ऐकलं नाही त्यानंतर धुमाळने त्याच्यावर कोयत्याने 50 वार केले. त्याचबरोबर तो सोबत कटर मशीनदेखील घेऊन आला होता. मात्र त्याने मृतदेहाचे तुकडे न करता घराबाहेर पडला. आरोपी व तरुणी स्वयंमच्या हत्येनंतर बिल्डिंगच्या खाली आले आणि तिथेच बसून सिगरेट पित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मयुरेश आणि त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.