ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना दुसरीकडे ठाणेकर नागरिकांनीही आपल्याला काय हवे, हे सांगणारा जाहीरनामा मांडला आहे. यासाठी ठाणे सिटीझन फाउंडेशनने पुढाकार घेतला असून या जाहीरनाम्यात ठाणेकरांनी मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे सिटीझन फाउंडेशन ठाणेकरांसाठी विविध उपक्रम राबवत असते. या फाउंडेशनसोबत अनेक गृहनिर्माण संस्था जोडल्या गेल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान या संस्थेने जाहीरनाम्यातून ठाणेकरांचे म्हणणे मांडले होते. या निवडणुकीतही त्यांनी ठाणे नागरिक जाहीरनामा तयार केला आहे. गेल्या १० दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाणे सिटीझन फाउंडेशने  पुढाकार घेऊन ठाणेकर नागरिकांच्या सूचना मागवल्या होत्या. या मोहिमेत जवळपास २०० हून अधिक नागरिकांनी आपल्या सूचना मांडल्या. या सूचनांच्या कॉमन मुद्द्यातून हा जाहीरनामा तयार करण्यात आला.


यात नागरिकांनी पाणी, वाहतूककोंडी, सुरळीत वाहतूक सेवा अशा मुद्द्यांना हात घातला आहे. घोडबंदर रोड येथे नवीन स्टेशन उभारण्याची सूचना मांडली आहे. तसेच, आम्हाला असा उमेदवार हवा जो स्वच्छ प्रतिमेचा असेल आणि जो नागरिकांच्या सूचनांचा विचार करून त्याची अंमलबजावणी करेल, असेदेखील ठाणेकरांचे म्हणणे आहे. ठाणे शहर हे विकसित होत आहे, त्यामुळे शहरातील समस्या या त्वरित सोडवल्या जाव्यात, अशी आमची इच्छा आहे, असे ठाणे सिटीझन फाउंडेशच्यावतीने मांडण्यात आल्यात   


नागरिक जाहीरनाम्यातील मुद्दे


- नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आधुनिक अग्नी - व्यवस्थापन सुविधा असावी
- मनोरंजन क्षेत्रांचा विचार व्हावा
- प्रत्येक प्रभागात वनक्षेत्र असावे
- हॉकर्स झोनची कठोर अंमलबजावणी व्हावी
- ज्येष्ठ नागरिकांचा विचार व्हावा
- ठिकठिकाणी पार्किंग झोन असावे
- कोपरी / कळवा पूल त्वरित तयार करावा
- पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी नवीन तंत्रज्ञान अमलात आणावे
- शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळेल, याचा विचार व्हावा
- शहर वाहतूककोंडीतून मुक्त करा