प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून साकारलेला हटके बंगला
पुण्यातला हा लई भारी बंगला एकदा पाहाच...
निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या एका बंगल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'घर बांधावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती, ते बांधताना असावी कल्पकता, नको नुसती माती' असं एकदम हटके वर्णन या हटके घराचं करता येईल.
पुण्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी वसलेल्या घेरा गावातला अतिशय सुंदर बंगला उभारण्यात येत आहे. हा बंगला चक्क प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून बांधलाय. राजेंद्र इनामदार यांची ही आयडियाची कल्पना आहे. अगदी बंगल्याच्या भिंती, छत, पायऱ्या, कंपाउंड वॉल एवढंच नाही, तर स्विमिंग पूल बांधण्यासाठीही प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्यात आल्या आहेत.
प्लास्टिक रियुज आणि रिसायकल या संकल्पनेतून हे घर बांधलं गेलं. त्यासाठी सिंहगडावरुन बाटल्या गोळा करुन आणल्या.
राजेंद्र इनामदार यांनी पर्यावरणाला दूषित होण्यापासून काहीसा हातभार म्हणून हा प्रोजेक्ट सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
भिंतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या एका विटेची किंमत ७ रुपये इतकी येते. याउलट जर प्लास्टिकची रिकामी बाटली वापरली तर ती चार रुपयांपर्यंत पडते. प्लास्टिक जमिनीत पुरलं तर त्याला डी कंपोज व्हायला साडेचारशे ते हजार वर्षे लागतात. पर्यावरणाची हानी टाळून हे स्वस्त आणि मस्त घर साकारण्यात येत आहे.