Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा (Coronavirus) विस्फोट झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनासंदर्भातली अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली. तर, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच 4 एप्रिल रोजी  711 कोव्हिड रुग्णांचं निदान झाले आहे. तर, गेल्या 24 तासांत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 3 एप्रिल रोजी 250 पेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली होती.  त्यात आज लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. मागील दहा दिवसांतील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. 


राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढतोय याकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष न करता तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी केली आहे. कोरोना महामारीसोबत सामना करण्यासाठी सरकारनं टास्क फोर्स स्थापन केलाय का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. हा विषय हलक्यानं घेऊ नये, असा सल्ला ही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. 


पुण्यात कोरोनाची लस उपलब्ध नाही


एकीकडे कोरोनाने डोकं वर काढलंय तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेच्या एकही रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध नाही. लसींचा साठा नसल्याने नायडू, कमला नेहरू, ससून हॉस्पिटल, सुतार दवाखाना यासारख्या मनपाच्या रुग्णालयात लसीकरण बंद झाले आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. 


साता-यात मास्कसक्ती


कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात राज्याची वाटचाल मास्कसक्तीच्या दिशेनं सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सातारा जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून मास्कसक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात एन्फ्लुएन्झाबरोबरच कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी दिल्यायत. त्यानुसार साता-याचे जिल्हाधिकारी रूपेश जयवंशी यांनी मास्क बंधनकारक करण्याचे आदेश दिले आहेत.  शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कसक्ती करतानाच आठवडी बाजार, बसस्थानक परिसर, यात्रा, मेळावे, विवाह समारंभसारख्या ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करावा असं आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.राज्यात तूर्तास मास्कसक्ती नाही मात्र त्रास होत असेल त्याने मास्क वापरावा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.