नागरिकांनो सावधान! पुढील 4-5 दिवस महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला अलर्ट
अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2-3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
Maharashtra Rains Updates: काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली पुढील 2-3 दिवसांत आणखी तीव्र होऊन वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा आहे.
पुढील चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या भागांमध्ये हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
मुंबईसह उपनगरातमध्ये पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहू शकते. त्याचबरोबर आज सायंकाळी देखील गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगलीसह सोलापुरातील काही भागांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिसरात आकाश ढगाळ राहणार आहे. तर अधून मधून पावसाच्या सरी देखील पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील घाट भागात देखील हलका आणि मध्यम स्वरुपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये म्हणजेच पाटण, महाबळेश्वर, जावळी, सातारा, कराड, वाई तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सांगलीत आज 27 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअम तापमान होते.
सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील करमाळा, माढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.