प्रथमेश तावडे (प्रतिनिधी) झी 24 तास :  लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेचं बिगुल वाजणार आहे. विधानसभेच्या जागावाटपावरून सर्वच राजकीय पक्ष तसेच युती आणि आघाडीमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पक्षांमध्ये अंतर्गत रस्सीखेच सुरु आहे. त्यात आता काँग्रेसनं मविआतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीपुर्वीच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या चेह-यावरून मतभेद असल्याचे समोर येत असतानाच, त्यातच बाळासाहेब थोरातांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबईतील भाईंदरमधील काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बाळासाहेब थोरातांनी पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा होणार असं विधान केलंय.


काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीतून कोणीही इच्छुक नाहीअसं विधान केलं होतं. तर शिर्डीतील सभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील, 'मला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न तेव्हाही पडत नव्हतं आणि आताही नाहीये' असं म्हणत एकप्रकारे मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. तसेच शिर्डीतील या सभेत जेव्हा मंचावर नाना पटोलेंची एंट्री झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे पाहून आपला पुढचा बॅट्समन आलेला आहे असं विधान केलं होत. 


हेही वाचा : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी


 


सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. यामध्ये लोकसभेला काँग्रेसनं जास्त जागांवर विजय मिळवल्यानं विधानसभेला सर्वाधिक जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. तर आता बाळासाहेब थोरात यांनी पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार असल्याचं म्हटल्यानं  मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी युती तोडणारे उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात, याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील आहे.