राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.

राजीव कासले | Updated: Sep 19, 2024, 07:10 PM IST
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी title=

Maharashtra Politics : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) थेट लढत होणार असं वाटत असतानाच आता तिसऱ्या आघाडीने (Third Alliance) रणशिंग फुंकलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रीत तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा राहणार असल्याची चर्चा सुरु होती. आज याला मूर्त रुप आलं आहे. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत तिसऱ्या आघाडीला 'महाशक्ती परिवर्तन' असं नावही देण्यात आलं आहे. ट

कोण आहे तिसऱ्या आघाडीत?

तिसऱ्या आघाडीत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा समावेश आहे. परिवर्तन महाशक्तीचा पहिला मेळावा 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनाही तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याविषयी विचारण्यात आलं आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील, रत्नराज आंबेडकर आणि आपण सर्वांनी एकत्र आलं पाहीजे अशी चर्चा सुद्धा झाली.

महायुतीला मोठा धक्का

महायुतीत असलेल्या बच्चू कडूंनी अखेर महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केलीय. झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात बच्चू कडूंनी महायुतीतू बाहेर पडत असल्याची मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीमध्येही अमरावतीत उमेदवार देत बच्चू कडूंनी बंडाळी केली होती. मात्र आता त्यांनी महायुतीलाच सोडचिठ्ठी दिलीय. तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक पार पडल्यानंतर संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी महायुती बाहेर पडलो हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली, असे म्हणत महायुतीला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केलं. परिवर्तन महाशक्तीच्या चिन्हाबाबत लवकरच कळवू. जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही, असेही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस आणि भाजपनंही स्वामीनाथन आयोग लागू केला नाही असा आरोप करत बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तिच्या बॅनरखाली निवडणूका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तिसऱ्या आघाडीची मतं महायुती तसंच महाविकास आघाडीसाठीही निर्णायक ठरणार आहेत. तेव्हा बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचा फटका कोणाला बसतो हे विधानसभेच्या निकालातच दिसून येईल.