Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. अशातच आता महाविकास आघाडीत वेगळाच पेच निर्मिाण झालेला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांच्यातील जुना वाद महाविकास आघाडीला भोवण्याची शक्यता आहे. दोघांपैकी माघार घ्यायला कुणीच तयार नाही. 


मुंबईतील लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत तणाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर पश्चिम , दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागांसाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र ठाकरे गट यातल्या कोणत्याही दोनच जागा देण्यास तयार आहे, त्यामुळे तिढा निर्माण झालाय. खासदार गजानन किर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून लढण्यासाठी संजय निरूपम आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद सुरू आहेत. 


लोकसभेसाठी मविआच्या अंतिम जागावाटपावर 27-28 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आलीय, या बैठकीत मविआच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथेला यांनी सांगितलंय. काँग्रेस राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली, या बैठकीत काँग्रेसच्या पक्षसंघटन आणि आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. बैठकीनंतर जागावाटप अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चेन्नीथेला यांनी सांगितलंय. 


काँग्रेस  प्रदेश राज्य निवड मंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्वाचा ठराव करण्यात आला.   लोकसभा उमेदवारांच्या नावाच्या शिफारशीचे अधिकार  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले आहेत.   दोन्ही नेते उमेदरवारांची शिफारस दिल्लीला करणार आहेत.  येत्या 6 तारखेस केंद्रीय उमेदवार छाननी समितीची दिल्लीत बैठक होणार आहे. लोकसभा उमेदवारांबबात या बैठकीत चर्चा होणार आहे. 


लवकरच मविआचं जागावाटप अंतिम होणार 


महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात आज फोनवरून चर्चा करण्यात आली. ज्या जागांवर वाद आहे त्या जागांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. त्यामुळे आता जागावाटपाच्या चर्चेला वेग येणार असून लवकरच मविआचं जागावाटप अंतिम होणार असल्याची माहिती आहे. 


ठाकरे गट लोकसभेसाठी 23 जागा लढवणार


शिवसेना लोकसभेसाठी 23 जागा लढत आलीय आणि आगामी निवडणुकीतही 23 जागाच लढवणार याचा पुनरुच्चार संजय राऊतांनी केलाय. मविआ जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्यापूर्वीच राऊतांनी 23 जागांवर लढण्यासंबंधी मोठं विधान केलंय.