मालक झाला बेपत्ता आणि त्याच्या आठवणीत त्याने सोडला प्राण
आजच्या युगात माणसांपेक्षा मुकी प्राणी किती इमानी असतात हे अलोरेमधील सुजय गावठेच्या कॅस्पर कुत्र्याने दाखवून दिले.
शिरगाव : चिपळूण तालुक्यातील अलोरे गावातील सुजय गावठे हा नदीत बुडत होता. त्याचा लाडका कॅस्पर नावाचा कुत्रा त्याच्यासोबत होता. आपला मालक पाण्यामध्ये बुडत आहे हे पाहून त्यानेही पाण्यात उडी मारली. तो मोठ्यामोठ्याने भुंकू लागला. मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्याचे प्रयत्न असफल ठरले.
दोन दिवसापूर्वी अलोरे गावातील कोळकेवाडी धरणामध्ये चार जण बुडाल्याची घटना घडली. त्यात सुजयही होता. मालक सुजय याला पाण्यात बुडताना पाहून कॅस्पर मोठ्यामोठ्याने भुंकू लागला. सुजय पाण्यात बुडला. इकडे कॅस्पर पाण्यातून बाहेर आला. तांबड वाडीत पोहोचला. त्याला घरी आणण्यात आले. घरामध्ये आल्यानंतर तो खूप शांत होता. मालक परत येईल याची तो वाट पाहत त्याने जेवणही सोडले.
घरच्यांनी कॅस्परला सुजय याचा मृत्यू झालेल्या घटनास्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. पण, आपला मालक पुढे येत नाही त्यामुळे कॅस्पर व्याकुळ झाला. तेथून परत घरी आल्यानंतर कॅस्परने घराच्या बाहेरील अंगणातच मान टाकली. त्या ठिकाणीच आपला जीव सोडला.
जिथे सुजय तिथे त्याचा कुत्रा हे एक समीकरण बनलं होतं. सुजय अजूनही बेपत्ता आहे. दोन दिवस होऊनही तो सापडला नाही. पण, त्यापूर्वीच त्याच्या कुत्र्याला चाहूल लागली आणि त्याने सुजयच्या आठवणीत आपला जीव सोडला.