नाशिक : पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशातून सडलेला गहू महाराष्ट्रात गोरगरीबांच्या गळ्यात मारला जात असल्याचं समोर आलं आहे. रेशनवर मिळणाऱ्या गव्हामध्ये किडे असल्याचं प्रकरण नाशिकमध्ये घडलं आहे. यामुळे शहरातल्या गरजू नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात पावसामूळे काढणीपूर्वीच मोठ्या प्रमाणावर गहू भिजला. त्यामुळे या गव्हावरील चमक नाहीशी होऊन तो काळवंडला. संबंधित राज्यांकडून महाराष्ट्राला असा लस्टर लॉस (चमक नसलेला) गहू मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात आला. हा गहू लाभार्थी शिधापत्रिका धारकांना वाटप करा असे निर्देश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने नाशिक जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाला दिले आहेत. त्यानुसार रेशन दुकानांमधून याच काळवंडलेल्या गव्हाचे वाटप केले जात असल्याने ग्राहक नाराज आहेत.


हा गहू चमकदार नसला, तो काळवंडलेला असला तरी या गव्हाची उचल करण्यापूर्वी भारतीय अन्न महामंडळाचा गुणवत्ता नियंत्रक आणि जिल्ह्यातील गुणवत्ता नियंत्रक यांच्याकडून संयुक्त तपासणी करावी. असे निर्देश सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने दिले होते. त्यानंतरही आवश्यकता भासली तर या गव्हाचे नमूने प्रयोगशाळेतून तपासून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गहू काळवंडलेला असला तरी तो खाण्यास योग्य असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून करण्यात येत असल्याने नागरिक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात भांडणे होत आहेत


मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूचे दर चांगलेच महागले आहेत. धान्याचे दरही आवाक्याबाहेर गेल्यामुळे घरखर्च भागविताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावीलागत आहे. त्यामुळे भूक भागावी याकरीता स्वस्त दरातीतील निकृष्ट धान्यामुळे गरिबांची थट्टा केली जात असल्याची भावना जनसामान्यांमध्ये व्यक्त केली जाते आहे.