झी मीडिया, आशीष अम्बाडे, चंद्रपूर : खरंतर वाघ जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. मात्र अडचणीत सापडलं की कुठचा राजा आणि कुठचं काय...अशीच वेळ आली ती शिरणा नदीपात्रात अडकलेल्या वाघावर...२४ तासाहून अधिक काळ गेल्यानंतर अखेर त्याची आयुष्य जगण्याची झुंज अयशस्वी ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर जिल्ह्यातल्या माजरी गावाजवळ सिरणा नदीत पडलेल्या वाघाच्या संपूर्ण घटनेचा थरार काही वेगळाच होता. नदीवरच्या अरुंद पुलावर बुधवारी पहाटे हा वाघ आला आणि समोरून आलेल्या गाड्यांमुळे गोंधळून त्याने पुलावरून खाली उडी मारली. तिथेच दगडावर आदळल्याने तो जखमी झाला. गावकऱ्यांना कळल्यावर तातडीने वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले.


गोंधळलेला वाघाने कशीबशी दगडात अडकलेल्या पायाची सुटका केली आणि नदीतल्या पाण्यात उडी घेतली. क्रेनने पाण्यात पिंजरा टाकून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. पिंजऱ्याच्या जवळ आल्याने तो आता पिंजऱ्यात अडकेल असं वाटताच पुन्हा अपयश आलं. 


मणक्याला लागलेल्या माऱ्यामुळे तो पिंजऱ्यात चढू शकला नाही. त्यातच त्याच्या जबड्याला जबर मारही लागला. रस्तस्त्रावही होत होता. अंधार झाल्यामुळे वाघाचं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. जर हे रेस्क्यू ऑपरेशन रात्रभर सुरु राहीलं असतं तर निश्चितच वाघाचे प्राण वाचले असते. सकाळ होताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र वाघाने ही सकाळ पाहिलीच नाही...


वाघाच्या मृत्यूनंतरही रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी झालं नसल्याचं सांगत वनमंत्र्यांनी मात्र अधिकाऱ्यांचीच पाठराखण केली.


 


वनविभाग-वन्यजीव संस्था आणि पोलिसांच्या सहकार्याने वाघाच्या मृतदेहाला नदीबाहेर काढण्यात आलं... आणि एका वाघाचा २४ तास सुरु असलेल्या जगण्याच्या संघर्षाच्या कहाणीचा असा शेवट झाला.