शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर शहराचा नळाने होणार पाणी पुरवठा एक ऑक्टोबरपासून बंद होऊन लातूरला टँकरने पाणी पुरवठा होणार होता. मात्र आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रशासनाने यात बदल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता एक नोव्हेंबरपासून लातूरचा नळाद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा हा अनिश्चित काळापर्यंत बंद होऊन लातूरला टँकरने पाणी वितरित केले जाणार आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हा बदल जाहीर केला आहे. त्यामुळे लातूरकरांना काही अंशी का होईना दिलासा मिळणार आहे. 


लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बीड-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धनेगव येथील मांजरा धरणात सध्या ०४.५ दलघमी इतका मृतसाठ्यातील पाणीसाठा शिल्लक आहे. कारण धरण क्षेत्रात अजूनही मोठा पाणीसाठा करणारा पाऊस झालेला नाही. त्यामुळे लातूरवर मोठे जलसंकट घोंगावत आहे. 


प्रशासनाने यापूर्वी एक ऑक्टोबरपासून लातूरचा नळाद्वारे होणार पाणी पुरवठा बंद करून टॅंकरने पाणी वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणुकीत शासकीय यंत्रणेवर येणारा ताण आणि पाणी टंचाईमुळे प्रशासनाने विभागीय आयुक्तांशी चर्चा करून आता एक नोव्हेंबरपासून नळाचे पाणी बंद करून टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलो. 


जर येत्या काही दिवसात परतीच्या पावसाने धरण क्षेत्रात हजेरी लावली तर या निर्णयात बदल होऊ शकतो असे ही लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 


मुळात आगामी दसरा-दिवाळी सण आणि निवडणुकीत लातूरला टॅंकरने पाणी द्यावे लागण्याची चर्चा सत्ताधारी भाजपच्या विरोधात जाऊ नये म्हणून हा निर्णय प्रशासनाने फिरवल्याची चर्चा लातूर शहरात सुरू झाली आहे. तूर्तास पुढील एक महिन्यासाठी लातूरकरांना दिलासा मिळाला असून १५ दिवसातून एकदा याप्रमाणे आणखी दोन वेळेस नळाद्वारे पाणी लातूरकरांना मिळणार आहे एवढे मात्र निश्चित.