कोकणी मेव्याला सोन्याचा भाव
कोकणातील ओल्या काजूगराला यावर्षी चांगला भाव मिळतो आहे.
प्रणव पोळेकर झी मीडिया, रत्नागिरी : कोकणातील ओल्या काजूगराला यावर्षी चांगला भाव मिळतो आहे. यावर्षीही काजू पिक कमी असलं तरी चांगले पैसे मिळवून देणार असल्याचं चित्र असल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
कोकणी मेवा असणाऱ्या ओल्या काजुगराला सध्या सोन्याचा भाव चढला आणि याला कारण देखील तसंच आहे. यावर्षी ओल्या काजुगराचे दर गगनाला भिडले आहेत. जर तुम्ही काजूगर खरेदीला गेलात तर प्रतिकिलोमागे तुम्हाला २५०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर किरकोळ बाजारात ओले काजूगर हे २० रूपयांना तीन नग अशी विक्री केली जात आहे.
कोकणात आलेली वादळं, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे यंदा काजू मोहोरलाच नाही. त्यामुळे यंदा काजूचं उत्पादन कमालीचं घटणार आहे. यावर्षीही काजू पिक कमी असलं तरी चांगले पैसे मिळवून देणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
तर काजूगराचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने ओल्या काजूची चव चाखण्यासाठी सर्वसामान्यांना काही काळ वाट बघावी लागणार आहे.