जयेश जगड, अकोला :  अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याचं घर फोडून चोरानं डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. सगळीकडे कोरोनाची प्रचंड दहशत असताना चोरट्यानं थेट कोरोना रुग्णाच्या घरीच चोरी केल्यानं अकोल्यात खळबळ उडाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्यात मंगळवारी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. अकोल्यातील मोहमद अली रोडवरील बैदपुरा भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाल्याचं मंगळवारी तपासणीत स्पष्ट झालं. हा रुग्ण व्यवसायानिमित्त दिल्लीला जाऊन आला होता असं कळतं. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील अन्य ९ सदस्य रुग्णालयात दाखल झाले. त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर कोरोनाबाधिताचं बैदपुरा भागातील घर काल बंदच होतं.


कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यानं रात्री चोरी केली. घरफोडी करून चोरी झाल्याची बाब सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं हा भाग सील करण्यात आला आहे. तरीही चोरट्यांनी या घरात चोरी करण्याचं धाडस केलं. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेत असताना चोरटा थेट कोरोनाग्रस्ताच्या घरात शिरला.


कोरोनाग्रस्ताच्या घरात चोरी झाल्यानं पोलिसांनाही तातडीनं पंचनामा करणं शक्य झालं नाही. घर आधी सॅनिटाइझ करून त्यानंतरच घरात पंचनामा केला जाणार आहे. महापालिकेचे अधिकारी आता या भागात दाखल झाले असून या संपूर्ण भागातही निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. तसंच कोरोना रुग्णाच्या घरीही निर्जंतुकीकरण केल्यानंतर चोरीचा पंचनामा केला जाणार आहे.


बेदपुरा भागात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या पत्नीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. तर कुटुंबातील अन्य सदस्यांचे सँम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल आज येणं अपेक्षित आहे.


 



अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं आता शहरात विशेष खबरदारी घेतली जात आहे. महापालिकेकडूनही विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण कोरोनाग्रस्ताच्या घरी चोरी झाल्यानं शहरात हा विषय चर्चेचा ठरला आहे.