बीड: उन्हाच्या झळांनी कासावीस झालेल्या जीवाला आमरस पाजून थंड करण्याच्या नादात बीड येथील एका व्यापाऱ्याला साडेपाच लाखाचा भूर्दंड बसला. कापूस व्यापारी श्रीराम झंवर यांच्या गाडीची काच फोडून आत असलेली सुमारे साडेपाच लाख रूपयांची रक्कम चोरट्यांनी हातोहात लांबवली. आमरस पिण्यासाठी झंवर हे खाली उतरले असता हा प्रकार घडला.


काय आहे प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड इथल्या नवगण राजुरी इथले कापूस व्यापारी असणाऱ्या श्रीराम झंवर यांनी एसबीआय बँकेतून सहा लाखांची रक्कम काढली होती. त्यानंतर आपल्या चारचाकी वाहनातून परत निघाले. दुपारच्या उन्हात आमरस प्यावा म्हणून इंदूर ज्यूस सेंटरवर पोहचले. मात्र परत आले तेव्हा त्यांना त्याच्या गाडीची काच फुटलेली आणि गाडीतील पैशाची पिशवी गायब झाल्याचे दिसलं. 


पाळत ठेऊन केली चोरी...


दरम्यान, या घटनेत चोरट्यांनी व्यापा-याचा एक ते दीड तास पाठलाग करत पाळत ठेवून चोरी केल्याचं समोर आलंय. लासलगावमध्येही सोमवारी एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून नऊ लाख रुपये लुटण्यात आलं होतं. अशा वाढत्या घटनांमुळे व्यापा-यांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे.


घटनेमुळे परिसरात खळबळ 


दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे,या प्रकरणातील चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत, या प्रकरणी बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हा शाखा आणि दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस चोरट्यांचा शोधासाठी रवाना झाले आहेत. या घटनेला चोवीस तास उलटून गेले तरी देखील अद्याप चोर पोलिसांना सापडलेले नाहीत हे विशेष.