बेळगाव: देशात सध्या ज्या काही घडामोडी सुरू आहेत, तेच हिंदुत्त्व असल्याचे अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे मुस्लिम बाजूलाच राहिले, आता हिंदू समाजातील लोकांचे समुपदेशन (Counselling) करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते शनिवारी बेळगावमधील कार्यक्रमात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी संजय राऊत यांनी अनुच्छेद ३७० आणि नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात भाष्य केले. राऊत यांनी म्हटले की, सरकार चालवण्यासाठी हिंदुत्व आधार नसावा. धर्माच्या आधारे देश चालवायचा झाला तर भारताचा पाकिस्तान किंवा इराण होईल. आमचे हिंदुत्व हे गाडगे महाराजांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात हिंसा झाली, केवळ महाराष्ट्रात झाली नाही. देशातील मुस्लिमांना सर्वप्रथम तुमच्याकडे मुसलमान म्हणून नव्हे तर देशातील नागरिक म्हणून पाहिले जाते, हे समजवायला हवे. आम्ही सध्या तेच करत आहोत, असे राऊत यांनी म्हटले. 


तसेच राऊत यांनी काश्मीर प्रश्नावरूनही केंद्र सरकारच्या धोरणावर बोट ठेवले. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती सुधारलेली नाही. तेथील बातम्या बाहेर येत नसल्यामुळे ही गोष्ट इतरांना कळत नाही. मात्र, काश्मीरमध्ये अजूनही बंदुकीच्या बळावर गाडा रेटला जात आहे. देशात सुरु असलेल्या या घडामोडींमुळे, हेच हिंदुत्व असल्याचा अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे मुसलमान सोडा आता हिंदू समाजाचेच काऊन्सिलिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपले काश्मीर म्हणता म्हणता देशाचा एखादा तुकडाच तुटणार नाही ना, असे वाटू लागल्याचे राऊत यांनी सांगितले.


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज बेळगावमध्ये आले आहेत. याठिकाणी त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना राऊत यांनी मी बेळगावमध्ये विचित्र परिस्थितीमध्ये आल्याचे सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून बेळगावात घडत असलेल्या घटनांबद्दल मला बोलावे लागेल. देशात भाषावार प्रांतरचन झाली तरी भाषेत वाद असता कामा नये. महाराष्ट्रात कानडी शाळांना अनुदान दिले जाते. महाराष्ट्र-कर्नाटकमधील वाद हे काही कौरव आणि पांडवांमधील युद्ध नाही. हे सांस्कृतिक युद्ध आहे. एकमेकांची डोकी न फोडता आपण संस्कृती टिकवायला पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले.