`मोदी मोठे नेते, पण शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही`
मला नरेंद्र मोदींविषयी आदर आहे.
बुलढाणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे नेते असले तरी त्यांची तुलना कधीच शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही, असे वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केले. ते रविवारी सिंदखेडराजा येथील जाहीर सभेत बोलत होते. भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून सध्या वाद पेटला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात शनिवारी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मात्र, नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याचा प्रकार अनेकांना रुचलेला नाही.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी सिंदखेडराजा येथील सभेत या पुस्तकावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी हे त्यांच्याठिकाणी मोठे नेते आहेत. ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांचीच काय इतर कोणाचीही तुलना केली जाऊ शकत नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले. तसेच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तात्काळ या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.
मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करण्यात काहीही गैर नाही- श्याम जाजू
यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना फटकारले होते. यानंतर पुन्हा एकदा संभाजीराजे यांनी भाजपच्या नेत्यावर टीकास्त्र सोडले आहे. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असणारे भाजप नेते श्याम जाजू यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एखादी व्यक्ती शिवाजी महाराजांप्रमाणे शूर आहे, धडाडीने निर्णय घेणारी आहे, असे आपण म्हणतो तेव्हा तो शिवाजी महाराजांचा अपमान ठरत नाही. उलट आपण त्या मोठ्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या गुणवत्तेचे कौतुक करतो. त्यामुळे विनाकारण वाद उकरून काढणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे असे श्याम जाजू यांनी सांगितले.
'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी'; भाजप नेत्याच्या पुस्तकावरून शिवप्रेमी संतप्त