नवी दिल्ली: भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदी यांची महती सांगणारे पुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे शीर्षक 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' असे ठेवण्यात आले आहे. भाजपच्या मुख्यालयात शनिवारी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मात्र, या पुस्तकाच्या शीर्षकावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला भाजपचे नेते श्याम जाजू आणि महेश गिरी हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजपही अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेक शिवप्रेमींनी पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला आहे.
काही दिवसांपूर्वीच छत्रपतींच्या घराण्याचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना फटकारले होते. त्यामुळे आता या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
दरम्यान, या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असणारे भाजप नेते श्याम जाजू यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लोकांनी पुस्तकाच्या केवळ नावावर न जाता त्यामागील हेतू लक्षात घेतला पाहिजे. तरीही क्षुल्लक कारणावरून ज्यांना वाद निर्माण करायचा आहे, त्यांच्याशी मला बोलायचेच नाही. शिवाजी महाराज हे एखादे घराणे किंवा राज्याची प्रॉपर्टी नाहीत. ते राष्ट्रीय मालमत्ता आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज फक्त आमचेच असा दावा त्यांचे वंशजही करू शकत नाहीत. देशातील अनेक लोकांना नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे शिल्पकार वाटतात. त्यामुळे नरेंद्र मोदी यांची महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांच्याशीही तुलना झाली आहे. यामध्ये काहीही गैर नाही, असे श्याम जाजू यांनी सांगितले.