मुंबई: राज्यातील नागरिकांनी आपला उत्साह  कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रभाव ओसरल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी राखून ठेवावा. यंदाचा गुढीपाडवा घरात राहूनच साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नागरिकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घरातून बाहेर पडून रस्त्यावर गर्दी करू नये. कोरोनाचा धोका पूर्णपणे ओसरल्यानंतर आपल्याला आनंद साजरा करण्यासाठी गुढीपाडव्याचा राखून ठेवलेला उत्साह कामी येईल, असे उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्रकातून अजित पवार यांनी नागरिकांना भाजीपाला, दूध, अन्नधान्याच्या खरेदीसाठी गर्दी न करण्याचे आवाहनही केले आहे. राज्यात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिकांकडून बाजारात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. नागरिक अकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. ‘कोरोना’च्या संसर्गाचा धोका वाढत आहे. 


राज्यशासनाचा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महापालिका, नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी सर्वजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. राज्याच्या प्रत्येक घरातला माणूस ‘कोरोना’च्या संसर्गापासून मुक्त रहावा यासाठी ते धोका पत्करत असताना, जनतेनेही संयम पाळून शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे अजित पवार यांनी पत्रकात म्हटले आहे. 


अजित पवार यांच्या पत्रकातील ठळक मुद्दे


- राज्यप्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी,
- पोलिसांना अंमलबजावणीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य
- नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावं. खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये.
- भाजीपाला, फळे, अन्नधान्य जीवनावश्यक पुरवठा सुरळीत ठेवणार.
- जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही सरकारची जबाबदारी.
- कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवणार
- भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांचा माल बाजारात येणार, त्यांचं नुकसान होणार नाही,
- राज्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलिस  चांगलं काम करत आहेत.
- आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरु, व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु.
- मास्क, सॅनिटायझर, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकणार.