एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सभापतींनी दिल्या या सूचना
राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे अजूनही आंदोलन सुरू आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत केली.
एसटीच्या फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब हे ही याला दुजोरा देतात. पण, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलनाबाबत विलीनीकरण आणि इतर विषययातून सामोपचाराने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे.
महाविकास आघाडी सरकार एसटी सुरू करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र, याचा प्रतिसाद तोकडा आहे. राज्यातील जनतेला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन करताना जे हाल होत आहेत त्याबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी निवेदन सादर करावे अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. तर, शासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुवर्ण मध्य काढावा असे ते म्हणाले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबत राज्य सरकारला निर्देश देताना सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्यासह विधानसभा व विधानपरिषदेच्या सदस्यांची समिती गठीत करावी असे सांगितले.